तयारी विधानसभेची: प्रत्येक बुथवर ३०० नवीन सदस्य बनविणार भाजपा ! दलित -मुस्लिम विभागांसाठी विशेष कार्यक्रम

Foto
  औरंगाबाद: वन बूथ २५ युथ या संकल्पनेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपाचे शिलेदार आता विधानसभेच्या कामाला लागले आहेत. काल शहरात पार पडलेल्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बूथ रचनेनुसार आता प्रत्येक बुथवर किमान तीनशे नवीन सदस्य बनविण्याचे टार्गेट भाजप केंद्रीय कार्यकारिणीने दिले आहे. मुस्लिम -दलित बहुल विभागांसाठी विशेष कार्यक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त भाजपाने छोटेखानी शक्ती प्रदर्शनच केल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. ही संधी साधत शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर किमान तीनशे नवे सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला ढासाळल्यानंतर भाजपातील घडामोडी शिवसेनेसाठी चिंता वाढविणाऱ्या आहेत. जिल्ह्यात भाजपा सेनेला वरचढ ठरू पाहत आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असल्याचे दिसते. आठवडाभरापूर्वीच फुलंब्री येथील कार्यक्रमात सेनेला डिवचण्याची संधी प्रदेशाध्यक्षांनी सोडली नव्हती. कालच्या कार्यक्रमातही कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी सेनेलाच टार्गेट करण्यात आले. पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नका, असे वारंवार म्हणत पराभवाचे शल्य अधिकच बोचरे करण्याचे प्रयत्न भाजपाकडून होत आहेत. एमआयएमला टार्गेट न करता सेनेला डिचविण्याचा भाजपाचा प्रयत्न न समजण्या जोगाच आहे.

 प्रत्येक बुथवर तीनशे नवे सदस्यांचे टार्गेट 
दरम्यान भाजपने अतिशय शिस्तबद्ध सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ केला आहे. प्रत्येक बुथवर २५ कार्यकर्ते दिवसभर किमान एक हजार मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. १८ वर्षावरील नवीन मतदारांची नोंदणी त्याच बरोबर पक्षाची सदस्य नोंदणी असे दोन्ही कार्यक्रम समांतर रित्या राबविण्यात येणार आहेत. शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक बुथवर अशाच प्रकारे मोहीम राबविण्यात येत आहे. एका विधानसभा मतदार संघात २५० ते ३०० बूथ आहेत. जिल्ह्यात साधारणत तीन हजारांपर्यंत भाजपचे बूथ आहेत. या बूथ वरील कार्यकर्त्यांना ३०० नवीन मतदार जोडण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. 

दलित- मुस्लिम प्रभागासाठी विशेष मोहीम : बोराळकर
 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम दलित कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भाजपा अल्पसंख्यांक आघाडी तसेच अनुसूचित जाती जमाती सेल सक्रिय करून शहरातील मध्य -पूर्व यासह पश्चिम आणि ग्रामीण भागातही अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आखले असल्याची माहिती भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker